टेंभुर्णी : माढा तालुक्यातील कोंढार भागातील तब्बल १५ गावांना आजपर्यंत दळणवळणाची कोणतीही सक्षम सार्वजनिक व्यवस्था उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देवाची रांजणी- आलेगाव मार्गे टेंभुर्णी- अकलूज बससेवा तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी केली आहे.
कोकाटे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोंढार भागातील १५ गावांतील नागरिकांना टेंभुर्णी किंवा अकलूज येथे जाण्यासाठी कोणतीही नियमित एस.टी. बस उपलब्ध नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शेतकऱ्यांना बाजारपेठेत जाण्यास अडचणी येतात. रुग्णांना उपचारासाठी वेळेत पोहोचणेही कठीण होत आहे. खासगी वाहनांवर अवलंबून राहणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही.
प्रस्तावित मार्गानुसार, टेंभुर्णी येथून सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा दिवसातून तीन वेळा बस सुटून देवाची रांजणी- आलेगाव (बु)- रुई- आलेगाव खुर्द- गारअकोले मार्गे बावडा- अकलूज येथे जावी आणि त्याच मार्गाने परतीचा प्रवास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ती खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरेल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
तसेच परिवहन व्यवस्थापक सोलापूर व कुर्डूवाडी डेपोप्रमुख यांना तातडीने आदेश देऊन वरील बससेवा सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी विनंती कोकाटे यांनी मंत्र्यांकडे केली आहे.
कोंढार भागातील जनतेच्या मूलभूत दळणवळणाच्या प्रश्नावर शासन किती वेगाने निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, ग्रामस्थांकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

























