सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून शासकीय प्रमाणित दिव्यांग बांधवांची झालेली उघड फसवणूक पाहता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मागील तीन वर्षांचा दिव्यांग निधी वितरीत करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. या ठरावानुसार शहाजहान इनामदार यांच्या नावाने पाच लाख रुपयांचा धनादेश मंजूर करून ग्रामपंचायत कार्यालयाकडून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सादर करण्यात आला.
मात्र, सदर धनादेश दोन वेळा परत आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या प्रकरणाची कैफियत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या समोर दिव्यांग बांधवांनी मांडली.
या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिवाळीपूर्वी बीबीदारफळ येथील सर्व ५३ दिव्यांग बांधवांना थकीत लाभ वितरीत करण्याचे, तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील उर्वरित ३६ गावांतील पात्र दिव्यांगांना देखील निधी देण्याचे ठोस आश्वासन दिले.
दिव्यांगाना न्याय न मिळाल्यास दिव्यांग बांधव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी दिला.
लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सुफिया इनामदार, अर्चना साठे, ऊर्मिला कुंचपोर, ॲड कॉ. अनिल वासम, अकिल शेख, असिफ पठाण, शहाजहान इनामदार, जगन्नाथ पवार, अमजद पठाण, प्रभाकर कलशेट्टी, इब्राहीम मुल्ला, संतोष पुकाळे, सज्जन ननवरे, विजय सर्वगोड, सुधीर चिकणे आदी उपस्थित होते .
यानंतर संघटनेने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांना ईमेलद्वारे निवेदन सादर केले.




















