धाराशिव : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्ती निमित्त तरुण भारत परिवारातर्फे प्रकाशित होणाऱ्या विशेषांकाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषांकाची मुख्य संकल्पना, विषयवैशिष्ट्ये, मांडणी आणि संपादकीय दिशा याबाबत मुख्यमंत्र्यांना तपशीलवार माहिती देण्यात आली.
याप्रसंगी विधीमंडळ सभापती ऍड.राहुल नार्वेकर, मंत्री पंकजा मुंडे,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार अभिमन्यू पवार, अर्चनाताई पाटील,मेघराज पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे यांच्यासह या भेटीवेळी तरुण भारत धाराशिव जिल्हा प्रतिनिधी अनिल आगलावे आणि उपसंपादक विपीन वीर उपस्थित होते.
विशेषांक अधिक सर्वसमावेशक, दर्जेदार आणि प्रेरणादायी व्हावा यासाठी संपादकीय टीमने केलेल्या तयारीची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. विशेषांकात नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवास, नेतृत्वक्षम कार्यशैली, निर्णायक धोरणनिर्मिती, विकासाभिमुख उपक्रम आणि राष्ट्रनिर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचा सखोल वेध घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण भारतच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. विशेषांकात मोदी यांच्या कार्यशैलीचा सर्वांगीण आढावा, शासन व्यवस्थेत आणलेले नवोन्मेष, तसेच समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या त्यांच्या उपक्रमांचा समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला. हा विशेषांक तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि वाचकांना विचारप्रवर्तक दृष्टी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी संपादकीय टीमला शुभेच्छा देत विशेषांक तथ्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि जनसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तरुण भारत परिवाराच्या या पुढाकारामुळे विशेषांकाबाबतची उत्सुकता अधिक वाढली असून, लवकरच तो वाचकांच्या हाती येणार आहे.



















