उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील सरकार बरखास्त करुन निवडणूक घेण्याची मागणी ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. अभिषेक घोसाळकर मृत्यू प्रकरण, राज्यातील वाढलेली गुंडगिरी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्राचं मन आणि जनता कमालाची दुखावली गेलेली आहे. सरकारमध्ये गँगवॉर आलेलं आहे. गेले दीड वर्ष सरकारच्या आश्रयानं गुंडगिरी सुरु आहे. गुंडांचे मंत्र्यांसोबतचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. गुंडांना मिळणारे संरक्षण चिंतेचा विषय आहे, असं ठाकरे म्हणाले. आमचा युवा कार्यकर्ता अभिषेक याची हत्या झाली. त्याच्यावर हल्ला करणारा गुंड त्यानं आत्महत्या केली. हे प्रकरण वरवर दिसतंय तसं नाही. गुंडानं तसं पाऊल उचललं असलं तरी त्यानं आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो. अभिषेक आणि त्या गुंडाचं फेसबुक लाइव्ह सुरु होतं त्यात गोळ्या लागताना दिसतात पण गोळ्या कोण मारतंय हे स्पष्ट होत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
गोळ्या त्या गुंडानं मारल्या की दुसऱ्या कुणी मारल्या,हाच प्रश्न माझ्या मनात आहे. पूर्वीचे राज्यपाल खूप कर्तव्यदक्ष होते, त्यांच्याच सोबत त्या गुंडाचा फोटो समोर आला आहे. त्यामुळं राज्यपालांकडे आम्ही जाणार नाही. गणपती विसर्जन मिरवणुकीत एका आमदारानं गोळीबार केला त्याच्यावर कारवाई झाली नाही. दहिसर भागातील आमदाराच्या मुलानं बिल्डरच्या मुलाचं अपहरण केलं होतं, त्याच्यावर कारवाई झाली नाही. काल पुण्यात निखील वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. भाजपच्या गुंडांनी त्यांना धमकी दिली होती, पोलिसांनी त्यांना अडवून ठेवलं होतं. पोलिसांनी काही कारवाई केली नाही. पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखांनी जनतेला पत्र लिहिलं असेल असं वाटत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.