तभा फ्लॅशन्यूज/सहयोग प्र.जावळे : महसूल दिन व छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अभियानाच्या निमित्ताने ताडपिंपळगाव, तालुका कन्नड येथे १ ऑगस्ट रोजी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या नियोजनातून हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाला आमदार संजना जाधव उपस्थित होत्या.
शिबिरात नागरिकांना विविध दाखले व सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले.
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रे : ३
जात प्रमाणपत्रे : ५
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रे : ३
उत्पन्न प्रमाणपत्रे : १६
रहिवासी प्रमाणपत्रे : २
यांचा समावेश होता. तसेच ८ सगायो संचिका प्राप्त झाल्या तर ६ राशन कार्ड ऑनलाईन करण्यात आले. ताडपिंपळगाव येथील संत सावता सभागृहाच्या जागेच्या नावामध्ये बदलाच्या प्रकरणावर शिबिरादरम्यानच कार्यवाही करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले. अवघ्या २५ मिनिटांत सातबारा तयार करून आमदार संजना जाधव यांच्या हस्ते संबंधितांना वितरित करण्यात आला. तात्काळ सेवेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी नायब तहसीलदार काळे व सोनवणे, सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सेतू सुविधा केंद्र संचालक, सरपंच सोनवणे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी केले. त्यांनी नागरिकांना रस्ता प्रकरणे दाखल करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच ॲग्री-स्टॅक नोंदणी व फार्मर आयडी तयार करण्याचे आवाहन केले. आमदार संजना जाधव यांनी महसूल प्रशासनाकडून नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले व या सुविधा अधिक गतिमान पद्धतीने पुरविण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत अधिकारी ताडपिंपळगाव यांनी मानले.