सांगोला – सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी तीरावरील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
समाजाने आपल्याला संस्कार, सुरक्षा, शिक्षण, असे अनेक सुविधा दिल्या म्हणून प्रत्येकाने काही ना काही प्रकारे समाजाला परत देणं गरजेचं आहे, हिच भावना मनी ठेवून सह्याद्री प्रतिष्ठान, सोलापूर विभागामार्फत जिल्ह्यात गेल्या काही दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे सिना नदीस आलेल्या पुरामध्ये शेतीचे, घरांचे अतोनात न भरून निघणारे नुकसान झाले.
नुकसान झालेल्या गावांपैकी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे व मोहोळ तालुक्यातील बोपले गावातील जि.प.प्राथमिक शाळेतील एकूण ३२१ विद्यार्थी यांना दप्तर (शालेय बॅग), वही (एकेरी, दुहेरी,चार रेघी व चौघडा), पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी आदी शैक्षणिक साहित्याचे किट तयार करून वाटप करण्यात आले.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर विभागाचे अविनाश पोफळे, गोविंद सुरवसे, शेखर चाळसी, अलंकार पताळे पाटील, ऋषी शिंदे, योगेश पाटील, संतोष तेलंगी, लिंबाजी आदटराव, काकासाहेब पताळे पाटील, औदुंबर पताळे पाटील, सागर पताळे पाटील, जयवंत कुलकर्णी, दुर्गसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिऱ्हे येथे शाळेचे मुख्याध्यापक महावीर उपाध्ये व बोपले येथे शाळेचे मुख्याध्यापक आण्णासाहेब यादव तसेच सर्व शिक्षक, शिक्षीका यांचे व या उपक्रमास सोलापूर जिल्हा तसेच सह्याद्री प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग विभाग, पुणे विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.