सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर येथील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील E2SA समितीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देत या वर्षीची दिवाळी एक वेगळ्या पद्धतीने साजरी केली.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोंडी येथील संतोष निळ यांच्या लहान मुलांच्या आश्रमाला भेट देऊन अन्नधान्य, किराणा साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करून या दिवाळी सणाचा आनंद गरजू मुलांशी वाटून हा आनंद द्विगुणित केला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपुलकी आणि जबाबदारीची जाणीव दाखवत “सेवा हीच खरी शिक्षणाची ओळख आहे” हा प्रेरणादायी संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे आश्रमातील लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. दिवाळीचा उत्साह आणि प्रेम यावेळी अधिक उजळला.
या सामाजिक कार्यामध्ये सिंहगडचे प्रा. माणिक शिंदे, यशवंत बडेकर, तसेच विद्यार्थी प्रतीक थिटे, पवन चव्हाण, ओंकार तांडले, भीमा हिप्परगी, तेजस पवार, विशाल राघोजी, राज चव्हाण आदींनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांनी एकत्र येऊन आश्रमातील मुलांसाठी अन्नधान्य, कीट, स्नॅक्स आणि दिवाळी फटाके देऊन आनंदसोहळा साजरा केला.
हा उपक्रम इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार बिरादार सरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. डॉ. बिरादार सरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कॅम्पस डायरेक्टर संजय नवले आणि प्राचार्य डॉ शंकर नवले यांनी या विषयी बोलताना म्हटले की, “अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे, तर समाजाप्रती जबाबदारीची जाणीव असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवून समाजसेवेचा उत्कृष्ट आदर्श ठेवला आहे.”
E2SA समितीच्या या सामाजिक दिवाळी उपक्रमाने विद्यार्थ्यांचा उत्साह, सामाजिक भान आणि सेवाभाव एकत्र आणला. हा प्रयत्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला असून, महाविद्यालयानेही विद्यार्थ्यांच्या या कार्याचे मन:पूर्वक कौतुक केले आहे.

























