सोलापूर – १ डिसेंबर जागतिक एचआयव्ही दिनाचे औचित्य साधून साकव फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत एक उपक्रम राबवला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विहान कार्यालयात एचआयव्ही प्रभावित बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास साकव फाउंडेशनचे कार्यकर्ते तय्यब शेख, आदिल शेख, मरीस्वामी जगले, सुरेखा घोडके व विधान संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून एचआयव्ही प्रभावित बालकांमध्ये पौष्टिक आहाराची जाणीव वाढवणे, त्यांना आरोग्यदायी जगण्यासाठी आवश्यक आधार देणे आणि समाजातील सर्वसमावेशकतेचा संदेश पोहोचवणे हा उद्देश साधला गेला.
साकव फाउंडेशन गेल्या पंधरा वर्षापासून एचआयव्ही प्रभावित बालक, महिला, तसेच गरजूंसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असून मानवीयतेला केंद्रस्थानी ठेवून समाजातील उपेक्षित घटकांना बळ देणे हे साकव चे मुख्य उद्दिष्ट आहे.
या प्रसंगी बोलताना डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले की, “एचआयव्ही प्रभावित बालकांचे पोषण, आरोग्य व शिक्षण हा साकव फाउंडेशनचा सातत्याने प्राधान्यक्रम राहिला आहे. समाजाने या मुलांकडे सहानुभूतीने पाहणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हातभार लावणे ही काळाची गरज आहे.”
















