वेळापूर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळापूर (मुली) येथील विद्यार्थिनींनी माळशिरस तालुकास्तरीय लंगडी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला आहे. या विजयी संघाची पुढील फेरीसाठी म्हणजेच जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल विद्यार्थिनींचा उत्साह वाढावा व त्यांना पुढील स्पर्धेसाठी आवश्यक प्रोत्साहन मिळावे, यासाठी युवानेते साहिल आतार यांच्या वतीने विजेत्या संघास क्रीडा किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेळापूर ग्रामपंचायतचे सरपंच रजनीश बनसोडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करत, “खेळामुळे शिस्त, संघभावना व आत्मविश्वास निर्माण होतो. ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही मोठी झेप घ्यावी,” असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास रणजीत सरवदे, दिलीप जगदाळे, उपाध्यक्ष सुनील साठे, शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी , इंग्लिश स्कूलचे उपाध्यक्ष अमोल मंडलिक यांच्यासह युवानेते प्रदीप सरवदे, समाधान काळे, आहिल पठाण, अभिजीत गवळी, दयानंद वाघमारे , शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्या, शाळेतील सर्व शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सत्कारप्रसंगी बोलताना साहिल आतार यांनी, “ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास या मुली जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर नक्कीच यश मिळवतील,” असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या पुढील वाटचालीस यश मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


























