नायगांव – रामतीर्थ पोलीस ठाणे हद्दीत गो-तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी तत्पर आणि धाडसी कारवाई करत तिघा गो-तस्करांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून रामतीर्थ पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.२२ वाजता नरसी ते बिलोली मार्गावर मध्यवर्ती बँकेसमोर असलेल्या राज्य महामार्गाच्या दुभाजकावर एक गाय रवंथ करत उभी असल्याचे आढळून आले. मात्र तिचे वासरू जवळ नसल्याने संशय बळावला. चौकशीत अज्ञात चोरट्यांनी वासराला जबरदस्तीने कारमध्ये कोंबून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. वासरापासून दूर झाल्याने गाईची अवस्था अत्यंत हळहळजनक होती.
याबाबत माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रामतीर्थ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने जलद हालचाली करत आरोपींचा शोध घेतला.
या प्रकरणी रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गो-तस्करी व चोरी करणारे आरोपी मोहम्मद अजीम मोहम्मद सिराज (रा. नांदेड), शेख आश्रम पिता शकील (रा. मनोर, ता. मनोर, जि. पालघर) आणि आयुब खान (रा. मुंब्रा, जि. ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली XUV कार पोलिसांनी जप्त केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या यशस्वी कारवाईमुळे गो-तस्करी विरोधात पोलिसांचा कडक इशारा मिळाला असून सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. पुढील तपास सुरू आहे.























