सोलापूर – लहानपणापासून दिवाळी आली की नवीन कपडे ,फराळ ,फटाके या व्यतिरिक्त दिवाळी अंकाचे वेध असायचे .आता कपडे ,मिठाई ,फटाके आयुष्यातून कधीच बाद झाले ,पण उरले आकर्षण ते दिवाळी अंकाचे. दिवाळी हा सण फक्त दिव्यांचा नाही तर विचारांचा, नवी उमेद निर्माण करण्याचा व चांगल्या मूल्यांची उजळणी करण्याचा सण आहे असे प्रतिपादन सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजू भुमकर यांनी केले.
भवानी पेठ येथील सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलात दीपावली निमित्त विविध दिवाळी अंकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शांनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष राजू भुमकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे,शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल,संस्थेचे सदस्य भरतकुमार शालगर,प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद,इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार व इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सविता हातवळणे आदि उपस्थित होते.
यावेळी सर्व दैनिकांचे दिवाळी अंक व इतर नामवंत दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. समाजातील सकारात्मक घडामोडी, साहित्याची नवी दृष्टी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अंक प्रदर्शनात आहेत. या दिवाळी अंकातून विद्यार्थ्यांच्या मेंदुसाठी अत्यंत सकस व पोषक फराळ,वैचारिक मेजवानी विद्यार्थ्यांना लाभणार आहे असे मत संजीव बिद्री यांनी व्यक्त केले.
प्रारंभी राजू भुमकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक जय कबाडे यांनी केले तर आभार मल्लेश पुरवंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांेनी परिश्रम घेतले.


















