सोलापूर – सर्वसामान्य जनतेला शुद्ध पाणीपुरवठा व स्वच्छता या दोन विषयांना प्राधान्य देणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या – अखत्यारित काम करणाऱ्या जल जीवन मिशनमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यापासून मानधनच देण्यात आले नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांकडून दिवाळीपूर्वी तरी मानधन देण्यात येणार की, दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदमधील जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हा सल्लागार, तालुका स्तरावरील गट संसाधन केंद्रातील गट व समूह समन्वयक कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी
कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून मानधन थकीत आहे. परिणामी, आठ दिवसावर दिवाळी सण आला असताना त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे शासनाने दिवाळी सणाच्या अगोदर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे परिपत्रक काढले आहे. पण या कर्मचाऱ्यांसाठी मात्र निधी उपलब्ध नाही हे कारण देऊन शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
थकीत मानधन संदर्भात वेळोवेळी राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाशी संपर्क साधला. केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही. म्हणून मानधन देणे शक्य नाही. अशी मोघम उत्तरे मिळतात. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसेच राज्याच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदने सादर करून मानधन तातडीने मंजूर करण्याची मागणी केल्याचे कर्मचारी सांगत आहेत.