सोलापूर – एसटीच्या सोलापूर विभागाने दिवाळीच्या आठ दिवसांत १४ कोटी सहा लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे. आठ दिवसांत सोलापूर विभागाने एकूण २५ लाख ५५ हजार किलोमीटरची प्रवासी वाहतूक केली आहे. दिवाळीनंतर आता कार्तिकीवारीतून एसटीला मोठ्या कमाईची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे सोलापूर एसटीची यंदाची दिवाळी ही चांगले उत्पन्न देणारी फायदेशीर ठरलेली दिसत आहे.
यंदाच्या दिवाळीची प्रवासी वाहतूक अद्यापही सुरू आहे. अजूनही एसटी बसला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. दिवाळीला माहेरी गेलेल्या माहेरवाशीनींचा अद्यापही परतीचा प्रवास सुरूच आहे. शाळा सुरू होण्यास अद्याप अवकाश असल्याने आणखी आठ दिवस पूर्ण गर्दीचा हंगाम सुरूच राहणार आहे. तसेच याच कालावधीत कार्तिक वारी असल्याने एसटीला पुढील आठवडाभरही मोठ्या उत्पन्नाची संधी निर्माण झाली आहे. एसटीच्या सोलापूर विभागाने ( दि.१८ ते २६ ऑक्टोबर) या कालवधीत दिवाळीतील एकूण दिवसांत एकूण २५ लाख ५५ हजार किलोमीटरची प्रवासी वाहतूक केली आहे. या कालावधीत सवलत मूल्य धरून १४ कोटी ६ लाख रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे.
हंगामी भाडेवाढ तरीही एसटीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून दिवाळी आणि उन्हाळी अशा दोन हंगामी स्वरूपात एसटीची भाडे वाढ केली जाते. या हंगामी काळात एसटीजी पंधरा ते वीस टक्के भाडे वाढ केल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री बसते. मात्र तरीही यंदाच्या वर्षी प्रवाशांनी भाडेवाडीचा बाऊ न करता सुरक्षा आणि नियमितता यांना प्राधान्य देऊन एसटीनेच प्रवास केला. त्यामुळे एसटीवर प्रवाशांचा असणारा विश्वास वाढून एसटीच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसत आहे.
कार्तिकीतूनही मोठे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विठू माऊलीची आषाढी एकादशीनंतरची दुसरी महत्त्वाची कार्तिकी एकादशी यात्रा दिवाळीच्या काळात असते. कार्तिकी एकादशीनिमित्त देखील भाविकांची आणि वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पंढरपूरला गर्दी असते. त्यामुळे राज्यभरातून प्रत्येक भक्त पंढरपुरात दाखल होत असतो. विठू माऊलीच्या दर्शनासाठी भक्तगण एसटीचा आधार घेतो. त्या अनुषंगाने राज्यातील विविध एसटी विभागातून ज्यादा बसेस पंढरपूर मार्गावर सोडण्यात येणार आहेत. या कार्तिकी वारीमधून देखील सोलापूर एसटी विभागासह राज्यमार्ग परिवहन महामंडळाला मोठे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देऊन चांगले उत्पन्न प्राप्त केले.
दिवाळीच्या काळात सर्व आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षक, चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय कर्मचारी यांनी आगारातील बसचे तसेच बस स्थानकावरून प्रवासी वाहतुकीचे उत्कृष्ट नियोजन केले. जास्तीत जास्त बस चालवून सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना उत्कृष्ट सेवा दिली.
– अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, सोलापूर एसटी विभाग




















