या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन , 22 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा आणि 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज या प्रमाणे ४ दिवस दिवाळीचे आहेत.
नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रदोषकाळात अमावास्या असून दुसरे दिवशी 21 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून सायंकाळ पर्यंत अमावास्या असलेल्या दिवशी धर्मसिंधु, पुरुषार्थ चिंतामणि, तिथिनिर्णय इ. ग्रंथांमधील वचनांचा विचार करून मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. *21 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेले लक्ष्मीपूजन धर्मशास्त्रसंमत असून यादिवशी सूर्यास्तापूर्वी अमावास्या संपत असली तरीही मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी व प्रदोषकाळात (सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत) लक्ष्मीपूजन करावे.*
महाराष्ट्रात दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णयसागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील १०० पेक्षा अधिक पंचांगात आणि अन्य सर्व कॅलेंडर मध्ये सुद्धा 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तसेच आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरीत आहात, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.
– मोहन दाते (दाते पंचांगकर्ते)
*दिवाळीतील दिवसांची माहिती*
*वसुबारस (17 ऑक्टोबर 2025, शुक्रवार)*
या दिवशी सौभाग्यव्रती स्त्रीया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून सूर्यास्तानंतर पूजन करतात.
ततः सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ।।
अर्थ – हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात अशावेळेस गाय वासराच्या मूर्तीची देखील पूजा करता येते. ते ही शक्य नसल्यास गाईच्या चित्राची पूजा करता येते. मात्र अशा वेळेस गाईच्या गोग्रासाकरिता म्हणून आपल्या भागातील गोशाळेस शक्य ते सहकार्य करावे.
*धनत्रयोदशी, यमदीपदान (18 ऑक्टोबर 2025, शनिवार)*
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने – नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यु म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यु येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व घरातील प्रत्येकाने खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा.
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
*नरक चतुर्दशी – (20 ऑक्टोबर 2024, सोमवार)*
नरकासुराने 16 हजार 108 स्त्रीयांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यु येऊ नये म्हणून यमाला खालील 14 नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे. वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे. 1) यम 2) धर्मराज 3) मृत्यु 4) अंतक 5) वैवस्वत 6) काल 7) सर्वभूतक्षयकर 8) औदुंबर 9) दध्न 10) नील 11) परमेष्ठिन 12) वृकोदर 13) चित्र 14) चित्रगुप्त
*लक्ष्मीकुबेर पूजन – (21 ऑक्टोबर 2025, मंगळवार)*
शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.
नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्त्वदर्चनात् ।।
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥
अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.
*लक्ष्मीपूजन मुहूर्त (21 ऑक्टोबर 2025, मंगळवार)*
दु. ३ ते ४:३०, सायं. ६ ते ८:३०, रात्री १०:३० ते १२:००
(लक्ष्मी पूजन विषयक सविस्तर खुलासा दाते पंचांग पान ८६ वर पहावा.)
*बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) – (22 ऑक्टोबर 2025, बुधवार)*
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.
*वहीपूजन मुहूर्त (22 ऑक्टोबर 2025, बुधवार)*
पहाटे ३:०० ते ६:००, सकाळी ६:३० ते ९:३०, सकाळी ११:०० ते १२:३०
*यमद्वितीया (भाऊबीज) – (23 ऑक्टोबर 2025, गुरुवार)*
नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील इतर सण – उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात – कुटुंबात एकोपा राखला जातो.
प्रत्येक धर्मीयांच्या सण – उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी – विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण – उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.
मोहन दाते (दाते पंचांगकर्ते)