सांगोला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका टीव्ही चॅनलवर मुलाखत देतेवेळी शक्तीपीठ महामार्गाबाबत धाराशिव पर्यंतचे काम मूळ आरेखणानुसार होणार असून पुढील काम म्हणजेच धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्हा यामध्ये थोड्या प्रमाणात रस्ता करण्यास विरोध असल्यामुळे त्याचे आरेखणात बदल करणार असल्याची कबुली दिली आहे. तरी शक्तीपीठ महामार्ग आरेखणात सोलापूर जिल्ह्यात बदल करू नका अशी मागणी सांगोला तालुक्यातील समर्थन करणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी रविवार दि.१४ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली.
नागपूर-पत्रादेवी-गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील बारा जिल्हयातून जात असून त्याबाबतचे आरेखण यापूर्वी महाराष्ट्र शासनाने राजपत्र जाहिर करुन वृत्तपत्रामध्ये प्रसिध्दीकरण केले होते. त्याअन्वये सदर आरेखणाचे काम मोणार्क या कंपनीने केले असून संबंधित रस्त्याच्या खुणा शेतकऱ्यांच्या जागेवर जावून प्रत्यक्ष खांब उभा करून केलेले आहेत. त्यानुसार सदर बाधित शेतकऱ्यास उपअधिक्षक भूमि अभिलेख यांचे मार्फत नोटीसद्वारे कळवून ७५ ते ८० टक्के मोजणीचे काम पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व मोहोळ या तालुक्याच्या मोजण्या पूर्ण होऊन बार्शी व सांगोला तालुका पुर्णत्वाच्या दिशेने मोजणीचे काम होत आलेले आहे. तसेच संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन उर्वरित मोजणीची कामे पूर्ण करण्यात कुठेही हरकत, अडथळा असणार नाही असे मत सांगोला तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग समर्थन करणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.
मूळ आरेखणामध्ये कोणत्याही स्वरुपाचा बदल न करता जीएमआर पूर्ण करुन सदर रस्ता करण्याबाबत शेतकऱ्यांची पूर्णपणे संमती आहे. अगर बदल केल्यास आम्ही संबंधित भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालयात जावून आत्मदहन करण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग समर्थन करणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी यावेळी दिला.


























