मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग तयारीला लागले असतानाच विरोधी महाविकास आघाडी व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे. जोपर्यंत मतदार यादीतील त्रुटी दूर केल्या जात नाही,तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ,अशी स्पष्ट भूमिका त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली.
सलग दोन दिवस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंग व निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे शिष्टमंडळ समवेत भेट घेऊन गाऱ्हाणी मांडली. त्यांच्याकडून शंकाचे समाधान होत नसून कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली. तसेच आयोगाचा सर्व्हर बाहेरील व्यक्ती हाताळत असून मतदार यादीत हवे तसे बदल करून याद्या अपलोड केल्या जातात, असा गंभीर आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथील संयुक्त पत्रकार परिषदेत केला. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील अनियमिततेवर गंभीर सवाल उपस्थित केले. संयुक्त पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह प्रमुख विरोधी नेते उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,’ भाजपाचे काही कार्यकर्ते हवं तसं मतदारयादीत नावं घुसवतात, हवे तेव्हा काढतात असं आमच्या निदर्शनास आलंय. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुमोटो याचिका दाखल करून घेतली पाहिजे. जशी पशुप्राण्यांबाबत सुमोटो दाखल करून घेता. कुणी लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही गाजवू पाहत असतील, तर आम्ही तसे होऊ देणार नाही. मतदार यादीतील घोळ सुधारत नाही, तोवर निवडणूक घेऊ नका. असे घोळ घालणाऱ्यांवर सदोष मत वधाचा गुन्हा दाखल करा,” अशी मागणी त्यांनी केली.
जयंत पाटील म्हणाले “मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून आम्ही एक निवेदन दिलं. महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनंत चुका दाखवल्या. काल आणि आज आम्ही काही पुरावे दाखवले, पत्र दिलं आहे. मतदार यादीत मतदारांचे पत्ते अपूर्ण दिलेले आहेत. नोंद असलेली व्यक्ती संबंधित पत्त्यावर राहत नाही, हेही पुराव्यानिशी दाखवून दिलं. एकेका मतदाराला चार ते दहा वेळा मतदानाचा अधिकार दिला आहे. मुरबाड, बडनेरा, नालासोपारा येथील पुरावे आम्ही सादर केले,” असे सांगून “महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सर्व्हर कोणीतरी दुसरा हाताळतो. विशिष्ट वेळी मतदार जोडले जातात, नंतर काढले जातात. निवडणूक आयोगाच्या बाहेरचा कोणीतरी हे हाताळत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला..
बाळासाहेब थोरात म्हणाले,’ “सदोष याद्यांबाबत आम्ही तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही. बाहेरचे मतदार यादीत घेतले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सहा सात महिन्यांत यात कोणत्याही दुरुस्ती केली नाही. तशीच दोषयुक्त यादी पुन्हा वापरली जाणार आहे. त्यामुळं ही निकोप निवडणूक मानण्याची गरज नाही. निवडणूक आयोगाच्या सर्व्हरचे पासवर्ड कोणालातरी दिलेत. जे बाहेरून ते हाताळत आहेत, असे राहुल गांधी म्हणतात त्यावर आयोग उत्तर द्यायला तयार नाही. यात राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे म्हणाले,’ “निवडणूक आयोग फक्त निवडणूक घेतो, तर राजकीय पक्ष प्रत्यक्षात निवडणूक लढवतात. जर निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवत नसेल, तर मूळ घोळ येथून होत असल्याचे सांगून ते म्हणाले,’ 2024 नंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर यादी जाहीर केली. त्यात फक्त मतदारांची नावे असून त्यांचा फोटो, पत्ता नाही. निवडणूक अधिकारी त्याबद्दल केंद्राकडून आले आहे आमचा संबंध नाहीअसे सांगतात. मतदार यादी न दाखवून काय साध्य करत आहात? मागील 5 वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली नाही. मग अशावेळी मतदार यादी सुधारल्यानंतर सहा महिन्यांनी निवडणूक घेण्यास काय हरकत आहे? यादी सुधारल्याशिवाय निवडणूक होऊ नये. आम्ही त्यांना काल जे निवेदन दिलंय. त्याबाबत ते काय निर्णय घेतात ते पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. असे सांगितले. विधानसभेला महायुतीच्या 232 जागा आल्यानंतर महाराष्ट्रात शांतता होती. यातून काय ते समजून जा. 2017 मध्ये सुद्धा महाविकास आघाडीसोबत दिसलो होतो. पण आता महत्त्वाचा मुद्दा आहे, निवडणूक पारदर्शक व्हावी,” असे सांगितले.
“
——–
देवांग दवेवर संशय :
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “देवांग दवे या राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीला ही वेबसाईट हाताळण्याचे कंत्राट दिलं आहे. तो यात सहभागी असल्याचा आमचा गोड समाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, “आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला सूचना केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या यादीतील मतदार यादीतील मतदारांचा शोध घ्या, बोगस मतदारांचा डेटा तयार करा. तो संयुक्तपणे निवडणूक आयोगाला सादर केला जाईल.’