शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे तो म्हणजे की पुढील आठवड्यात ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बाजाराची प्रतिक्रिया काय असेल. अशा परिस्थितीत, चांगल्या परताव्यासाठी कोणत्या शेअर्सवर डाव लावावा? मागील दहा वर्षात मोदी सरकारच्या धोरणांमुळे अनेक कंपन्यांना फायदा झाला असून बाजारातील गुंतवणूकदारांनी नवीन श्रेणी शोधून काढली आहे ज्याला त्यांनी ‘मोदी स्टॉक्स’ असे नाव देण्यात आले आहे.
निवडणुकीच्या आगामी निकालांपूर्वी ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने मोदींच्या ५४ स्टॉकची यादी जारी केली ज्यांना मोदी सरकारच्या धोरणांचा फायदा झाला असून यामध्ये जवळपास निम्म्या सरकारी कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ब्रोकरेजच्या या लिस्टमध्ये टाटा, किंवा अदानी समूहाच्या कंपन्यांचा नव्हे तर L&T, NHPC, PFC, ONGC, IGL, महानगर गॅस, भारती एअरटेल, इंडस टॉवर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश असून मोदी स्टॉक्सपैकी ९०% समभागांनी गेल्या सहा महिन्यांत निफ्टीपेक्षा आकर्षक परतावा दिला आहे.
मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्यापूर्वी खरेदी करण्यासाठी स्टॉक्स
४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील आणि मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल असा अनेक बाजार विश्लेषकांना विश्वास आहे. अशा स्थितीत, मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्यापूर्वी लागू केलेल्या धोरणांमुळे या कंपन्यांना मोठा फायदा होईल, असा ब्रोकरेजला विश्वास असून यापैकी बहुतांश कंपन्या कॅपेक्स आणि पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित आहेत ज्यामध्ये सरकारी आणि खाजगी कंपन्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे CLSA ने या निवडक शेअर्सचा ‘Modi Stocks’ म्हणून उल्लेख केला आहे.
ब्रोकरेज फर्म CLSA ने सांगितले की, निवडणुकीपूर्वी मागील सहा महिन्यांत बाजारात प्रचंड वाढ दिसून आले असून तेजीच्या बाजारात मोदींच्या ९०% शेअर्सनी निफ्टीपेक्षा चांगली कामगिरी बजावली. याशिवाय सध्याचे सरकार मजबूत बहुमताने परतले तर हाच कल कायम राहण्याची शक्यता ब्रोकरेजने वर्तवली आहे.
निवडणूक निकालापूर्वी ब्रोकरेजचे पसंतीचे शेअर्स
ब्रोकरेजच्या आवडत्या ५४ शेअर्समध्ये L&T, NTPC, NHPC, PFC, ONGC, IGL आणि महानगर गॅस आवडीचे आहेत. परंतु, बाजारातील तेजीला जून-जुलै महिन्यात ब्रेक लागण्याची शक्यता ब्रोकरेजने वर्तवली आहे. PSU शेअर्समधील तेजीचा ट्रेंड बजेट (अर्थसंकल्प) घोषणेपूर्वी जून किंवा जुलैपर्यंत कायम राहण्याचा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार
सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ४ जूनला समोर येईल आणि या निवडणुकीत भाजपला जवळपास ३०० जागा मिळतील असा बाजाराचा अंदाज आहे, त्यामुळे नव्या कार्यकाळात सरकार पायाभूत सुविधांवर भर देणे अपेक्षित असून भांडवली वस्तू, उपयुक्तता, संरक्षण, सिमेंट आणि रिअल इस्टेट यासारख्या पायाभूत क्षेत्रांना याचा फायदा होणे अपेक्षित आहे. परंतु भाजप कमकुवत झाल्यास उपभोग आणि गरीब कुटुंबांवर अधिक खर्च होईल, असे विश्लेषकांचे म्हणणे असून बाजाराला आवडणार नसले तरी यामुळे वापराशी संबंधित स्टॉक वधारण्याची शक्यता आहे.