बाऱ्हाळी / नांदेड – कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीरच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ साठी डॉ. बालाजी गंगाधर झटकोडे यांना ‘वैद्यकीय सेवा रत्न पुरस्कार’ प्रदान करून पुरस्कारार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुखेड तालुक्यातील मौजे दापका गुंडोपंत येथील डॉ. बालाजी झटकोडे यांनी वैद्यकीय सेवा हीच ईश्वरसेवा मानून अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात सातत्याने समाजोपयोगी रुग्णसेवा केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात उपचार देत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कै. त्र्यंबकआप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीरच्या वतीने त्यांना ‘वैद्यकीय सेवा रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. हा भव्य पुरस्कार सोहळा गुरुवार २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वा. ललित भवन मंगल कार्यालय, नळेगाव रोड, उदगीर येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे राहणार असून लातूर जिल्ह्याचे खासदार मा. शिवाजी काळगे हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजू भाऊ बनसोडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
डॉ. बालाजी झटकोडे यांच्या या सन्मानाबद्दल मुक्रमाबाद, बाऱ्हाळी, दापका विभागातून तसेच वैद्यकीय क्षेत्रातून तसेच सामाजिक परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


























