पंढरपूर – पंढरपूर नगरपालिका निवडणूकीसाठी तिर्थक्षेत्र विकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून डॉ.प्रणिता भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज रविवारी दाखल केला आहे. दुसरीकडे बंडखोरी होऊ नये याची परिचारकांकडून दक्षता घेण्यात येत असल्याने भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत अद्याप सस्पेन्स राखण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच सोमवारी भाजपाचा उमेदवार जाहीर होवून तो उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे परिचारकांच्या गोटातून सांगितले जात आहे.
पंढरपूर नगरपालिका निवडणूकीचे पडघम जोरदार वाजू लागलेले आहे. या निवडणूकीत सत्ताधारी परिचारकांच्या भाजप विरोधात विरोधी गटाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आव्हान असणार आहे.
भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी वैशाली वाळुजकर, साधना भोसले आणि शामल शिरसाट या तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान शनिवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर दौऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणूका भाजपा स्वबळावर आणि कमळ चिन्हावर लढविणार असल्याचे सांगितले होते. या बरोबरच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची भाजपाकडून नावे देखील कन्फर्म करण्यात आली असून ती मुंबई येथे श्रेष्ठींकडे पाठविण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. त्यामुळे पंढरपूर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून कोणाचे नाव कन्फर्म करण्यात आले आहे या बाबतची उत्सुकता निर्माण झालेली आहे.

दुसरीकडे नगराध्यक्षपदाच्या नावांबाबत बंडखोरीच्या भितीमुळे भाजपाकडून सस्पेन्स राखला जात असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होवून नगराध्यक्षपदासाठी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. एकंदरीतच पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे दररोज नवीन नवीन राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी मंडळींना एकत्र करून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येणार आहे. या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून डॉ.प्रणिता भालके यांनी आपला उमेदवारी दाखल केला आहे. यामुळे पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
————————–
डॉ. भालकेंना निश्चितच यश मिळणार : खासदार शिंदे
खासदार प्रणिती शिंदे या रविवारी पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पंढरपूर पालिकेच्या निवडणूकीसाठी भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून या निवडणूकीसाठी विरोधकांकडून तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लढविण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून यांना देण्यात आली आहे.पंढरपूर शहरांमध्ये माजी आमदार (कै.) भारतनाना भालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या बरोबरच भालके गटाचे काम देखील चांगले आहे.त्यामुळे या निवडणुकीत प्रणिता भालके यांना निश्चितच यश मिळणार असल्याचा विश्वास देखील यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
———————
आमदार पाटील आणि आमदार खरे निवडणूकांपासून दूर –
पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणूकीचे पडघम सध्या जोराने वाजू लागलेले दिसत आहेत. गेल्या दोन, तीन महिन्यापासून विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचे आमदार राजु खरे यांनी पंढरपूर नगरपरिषदेतील परिचारकांची गेल्या चाळीस वर्षाची सत्ता संपुष्टात आणण्याच्या आणाभाका केल्या होत्या. त्यासाठी परिचारक विरोधकांची मोट देखील बांधण्यासाठी आमदार अभिजीत पाटील, मनसेचे दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेत विरोधी गटाची जुळवा जुळव देखील केलेली होती.या मंडळींकडून पंढरपूर नगरपालिका निवडणूकांसाठी बैठकांचा सपाटा देखील सुरु होता. मात्र मोहोळचे आमदार राजु खरे हे निवडणूकीची घोषणा झाल्यापासूनच अलिप्त दिसत आहेत. तर भाजपाचे नेते प्रविण दरेकरांच्या दौऱ्यानंतर आमदार अभिजीत पाटील हे देखील निवडणूकी पासून अंतर ठेवून असल्याची चर्चा आहे.


















