सोलापूर – श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले योजनेचे उद्घाटन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता रुग्णालयात होणार असल्याची माहिती रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी दिली. या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे आणि हिंदवी परिवाराचे प्रमुख ख्यातनाम शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विशेषतः पूर्व भाग आणि एकूणच शहरात आर्थिक दुर्बल रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. उत्कृष्ट वैद्यकीय सेवेमुळे रुग्णांचा विश्वास संपादन केलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले योजना नसल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात या शासकीय योजना सुरू व्हाव्यात याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यानंतर शासनाने श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनांचे उद्घाटन आज (शुक्रवारी) सकाळी होणार असून या कार्यक्रमास सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन यांनी केले आहे.
 
	    	 
                                



















 
                