तभा फ्लॅश न्यूज/परळी वैजनाथ : प्रगती बालासाहेब चौधरी आपल्या अत्यंत गरीब, कठीण परिस्थितीतून वडीलांचे छत्र हरवल्यानंतरही मेहनत व कष्टाने डॉक्टर बनली व आता एमडीसाठी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत भारतात ५ वी आली आहे. याबदल येथील तेली समाज व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने तिचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
शहरातील माणिकनगर परिसरात चौधरी कुटुंब राहते. या कुटू़बातील सदस्य घरची परिस्थिती बेताची असल्याने इतरत्र काम करतात. याच कुटुंबातील बालासाहेब चौधरी हे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात जम बसवत असतानाच अगदी तरुण वयातच
ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बालासाहेब यांना एक मुलगी, एक मुलगा होता. तिचा व कुटूंबाचाभार आई ज्योती चौधरी यांच्यावर आला.
ज्योती यांनी आपल्या मुलाला व मुलीला शिक्षणासाठी काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली. प्रगतीचे १ ते १० वी पर्यंतचे शालेय शिक्षण शहरातील फाउंडेशन हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. याच काळात वडीलांचा मृत्यू झाला. घरच्या कठीण परिस्थितीमुळे पुढील शिक्षण पूर्ण करता येईल का नाही तसेच प्रगतीने डॉक्टर बनण्याचे ध्येय ठरवले होते. पण वडीलांच्या मृत्यूमुळे हे पूर्ण होईल का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण जिद्द, कष्ट व मेहनतीने पुढील शिक्षण पूर्ण केले. १० वी नंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश घेतला. याच ठिकाणी सीईटी व वैद्यकीय प्रवेशासाठी असलेली नीट परिक्षेची तयारी सुरू केली.
२०१८ मध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,धाराशिव येथे बीएएमएससाठी प्रवेश मिळाला. २०२४ मध्ये आपल्या आई व कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने अत्यंत कष्टाने, मेहनतीने, चिकाटीने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर बनण्याचे ध्येय साध्य केले. यानंतर डॉ प्रगतीने एमडी होण्यासाठी असलेल्या अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश दिली. या परीक्षेचा निकाल लागला असून डॉ प्रगती या परिक्षेत भारतात ५ वी आली आहे. याबदल डॉ प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबदल येथील तेली समाज व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने तिचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, सचिव प्रा मधुकर शिंदे, शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर जठार, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नांदेड विभागाचे उपाध्यक्ष प्रा प्रविण फुटके, ईश्वर राऊत, गोकुळ चौधरीसह आदी उपस्थित होते.
यासंदर्भात डॉ प्रगती बालासाहेब चौधरी यांनी सांगितले की, माझ्या अनुभवातून एवढेच सांगू इच्छिते की परिस्थिती प्रतिकूल जरी असेल तर जिद्द व चिकाटी ने कुठे ही न थकता त्यावर मात करून आपला मार्ग आपणच तयार करावा लागतो यश आपोआप मिळते.