सोलापूर – देशाचे मूळ असलेल्या संस्कृतीपासून भारताला विलग करण्याचे प्रयत्न होत असताना डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे जीवनकार्य मात्र भारताचे भारतीयत्व अखंडपणे टिकवण्यासाठी होते, असे प्रतिपादन तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष आणि ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.
ज्ञानप्रबोधिनीच्या राष्ट्रसमर्पित जेष्ठ कार्यकर्त्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्यावरील आठवणींचा संग्रह असलेल्या स्वर्णस्मृतिदले या स्मृतिग्रंथाचे आणि डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी लिहलेल्या स्वामी रंगनाथानंदजी यांच्या चरित्राचे प्रकाशन शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर ज्ञानप्रबोधिनीचे कार्याध्यक्ष गिरीश बापट, कार्यवाह सुवर्णा गोखले, सहकार्यवाह अमोल गांगजी, हराळी केंद्राचे प्रमुख अभिजीत कापरे उपस्थित होते.
ज्ञानप्रबोधिनीच्या राष्ट्रसमर्पित जेष्ठ कार्यकर्त्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे मार्च २०२५ मध्ये निधन झाले. त्यांच्यावर समाजातील १२५ मान्यवरांनी लिहलेल्या आठवणींचे संकलन या स्मृतीग्रंथात करण्यात आले आहे.
प्रारंभी ‘ध्येयाचा सुगंध’ ही डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. यात डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग नाट्य स्वरूपात सोलापूरकरांसमोर सादर करण्यात आले. यात ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला. या नाटिका सादरणीकरणाला सोलापूरकरांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला.
यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, साधना, संतसंगती, स्वाध्याय, आत्मचिंतन हा डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचा स्थायीभाव होता. त्यांचे जीवन तपस्विनी आणि वीरांगनेचे होते. साधक आणि योद्धा यांचे कार्यक्षेत्र जरी वेगळे असले तरी त्यांची उर्मी सारखीच असते. डॉ. भिशीकर यांचा आदर्श घेऊन काम करण्याचे उदाहरण पुढील पिढीला देण्याकरिता हा स्मृतीग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. समाजाकडून मला काहीही नको. मला केवळ समाजाची सेवा करायची आहे, असा भाव असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा प्रभाव त्यांच्यावर होता. प्रसिद्धीचा हव्यास सोडून समाज उन्नतीचा ध्यास घेतलेल्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी आयुष्यभर शिवभावे जीवसेवा केली असे गौरवोद्गारही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी काढले. ज्ञानप्रबोधिनीचे कार्याध्यक्ष गिरीश बापट यांनी यावेळी काढले.
ज्ञानप्रबोधिनीचे सहकार्यवाह अमोल गांगजी यांनी परिचय करून दिला. ज्ञानप्रबोधिनीच्या डॉ. अपर्णा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सोलापूरकरांनी हुतात्मा स्मृती मंदिरात प्रचंड गर्दी केली होती.
निस्वार्थ सेवाच खरी साधना; समाजकार्य करताना संयम व समर्पण आवश्यक
समाजासाठी काम करताना अनेक प्रसंगी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. कधी अशा लोकांकडेही वारंवार जावे लागते, ज्यांच्याकडे जाण्याची इच्छा सुद्धा मनात नसते. परंतु समाजहिताचा विचार मनात ठेऊन हे सर्व सहन करणे आणि कर्तव्य म्हणून ते पार पाडणे, हीच खरी साधना असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले.


























