सोलापूर – बाजारपेठा सक्षम करणा-या अर्थव्यवस्थेतून भांडवलशाही आणि मुठभर उच्यभ्रू लोकांचे हित होते.त्यामुळे सर्वसामान्य वंचित समूहाच्या, गरीबांच्या स्वाभिमानाने जगण्यासाठीचा विचार केंद्रस्थानी ठेवून अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा नवा दृष्टीकोन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिला आहे असे प्रतिपादन प्रा.एम.आर.कांबळे यांनी केले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग आणि कास्ट्राइब जि.प.कर्मचारी संघाच्यावतीने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात प्रा. एम.आर.कांबळे हे बोलत होते.त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षमय प्रसंग सांगितले.
उच्च पदस्थ नोकऱ्या मिळत असताना देखील डॉ.आंबेडकर यांनी वकीली व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवित संपुर्ण आयुष्य दिन दुबळ्या वंचितासाठी झिजवले. संविधानात अभिप्रेत असणारी सामाजिक आणि आर्थिक समता निर्माण करण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने रहावे तीच खरी आदरांजली डॉ. आंबेडकर यांना ठरेल असेही प्रा.कांबळे यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकिले यांनी केले.यावेळी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास कार्यकारी अभियंता खराडे, कास्ट्राइब जि.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर,कास्ट्राइब जि.प.कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे,स्वीय सहाय्यक नदाफ यांच्यासह समाज विभागातील कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती यांनी तर आभार विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांनी केले.



















