बार्शी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन वेळा चरण स्पर्श लाभलेल्या भीमनगर बार्शी येथील जेष्ठ अनुयायी यमुनाबाई बोकेफोडे यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी दि.२१ रोजी निधन झाले आहे. त्या भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी बोकेफोडे यांच्या वडिलांच्या आत्या होत्या. दि. २४ जानेवारी १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी बाबासाहेब बार्शीत आले होते. स्वागत करुन मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये यमुनाबाई आवर्जून उपस्थित होत्या. तसेच दि. २३ फेब्रुवारी १९४१ रोजी कसबे तडवळे येथे आयोजित सोलापूर जिल्हा व मोगलाई मराठवाडा परिषदेसाठी जाताना बार्शी रेल्वे स्टेशनवर बाबासाहेबांच्या दर्शनासाठी बार्शीतील अनुयायांनी गर्दी केली. यामध्ये ही यमुनाबाई बोकेफोडे आवर्जून उपस्थित होत्या.
महामानवाला जवळून पाहिलेल्या यमुनाबाई म्हणजे आंबेडकर इतिहासाच्या साक्षीदार होत्या. आजच्या तरुण पिढीला डॉ. बाबासाहेब समजावून सांगण्यासाठी त्या नेहमी या कर्तृत्वान महापुरुषाच्या ऐतिहासिक घटना आवर्जून सांगायच्या आणि त्या इतिहास सांगायल्या लागल्या की किती वेळा पण फक्त ऐकावे वाटायचे, असे तानाजी बोकेफोडे यांनी सांगितले.



















