अक्कलकोट – तालुक्यातील हत्तीकणबस येथे सुरू असलेल्या सोलर प्रकल्पाच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार समोर आली आहे. सध्या युद्धपातळीवर सुरू असलेल्या ड्रीलिंग कामामुळे उडणारी धूळ शेजारील पिकावर साचत असून ऊस, गहू, हरभरा तसेच आंबा पिकांवर त्याचा गंभीर परिणाम झाला असल्याने पिके वाळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्या आहे.प्रशासनाने या बाबत तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना कंपनी कडून नुकसान भरपाई मिळवून द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करूनही योग्य ती उपाययोजना करण्यात आलेली नाही. उलट अरेरावी व उद्धटपणे उत्तर देत दमदाटी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
परिस्थिती गंभीर होत चालल्याने संबंधित शेतकऱ्यांनी तालुका तहसीलदारांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करुन कंपनी कडून तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी व योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ड्रीलिंगदरम्यान धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी, संरक्षक जाळ्या उभारणे आदी उपाय तत्काळ राबवावेत, अशीही मागणी होत आहे.दरम्यान, सोलर प्रकल्प विकासासाठी असला तरी तो शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा ठरू नये, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.ड्रीलिंग मशीनच्या सततच्या आवाजासह उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे पिकांवर थर साचत आहे. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होऊन पिकांची वाढ खुंटत आहे. विशेषतः ऊस आणि गहू पिकांवर याचा अधिक फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
“आमच्या गावाजवळ एक सोलर कंपनीचे काम सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, सोलर प्रकल्पास आमचा कोणताही विरोध नाही; मात्र काम करताना शेजारील शेती पिकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. रोज होत असलेल्या ड्रीलिंगमुळे माझ्या शेतातील ऊस, गहू, हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणात धूळ बसत आहे. परिणामी पिके वाळत आहेत. लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सांगूनही ऐकण्याची मनस्थिती दिसत नाही,”
_ सिद्धाराम मोघे शेतकरी हत्तीकणबस

























