सोलापूर – ग्रामीण भागातील महिला बचत गटांतील महिलांच्या विकासासाठी जिल्हा परिषद येणार सेस फंडातून ड्रोन खरेदीसाठी कमाल ४ लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येत आहे. तालुकास्तरीय ग्रामसंघाची यासाठी निवड करण्यात येणार आहे. बचत गटाकडून चालविण्यात येणारे ड्रोन शेतशिवारात औषध फवारणीसाठी घुमणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांनी दिली.
जिल्हा परिषद सोलापूर सेस फंडातून कृषी विभागकडून महिला शेतकरी सशक्तीकरण (महिला किसान शक्तीपंख योजना) या योजनेअंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. ड्रोन खरेदी अर्थसाहाय्य या घटकांतर्गत सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी एकूण किमतीच्या ४० टक्के किंवा ४ लाखाच्या रक्कमेच्या मर्यादित राहून अनुदान देण्यात येत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या कडील नोंदणीकृत असलेला तालुक्यातील महिला ग्रामसंघ अर्ज करण्यास पात्र आहेत . महिला ग्रामसंघ लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पध्दतीने ऑफलाईन करण्यात येईल. यासाठी तालुकास्तरावरून अर्ज मागविण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जातून लॉटरी प्रक्रियेव्दारे लाभार्थी निवड झाल्यानंतर निवडपत्र लाभार्थीस देण्यात येईल.
कृषी विभागाकडून सन २०२५-२६ करिता ड्रोन उत्पादकांचे यादीतील ड्रोन उत्पादकांपैकी कोणत्याही एका उत्पादकाकडून ड्रोन खरेदी करणे बंधनकारक आहे. इच्छुक महिला ग्रामसंघानी ०१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांनी केला आहे.
…
महिला रोजगार ऊपलब्ध
…
शेतीमध्ये सर्वच पिकांसाठी औषध फवारणी आवश्यक बनली आहे. त्यामुळे महिला बचत गटांना औषध फवारणी करण्यासाठी ड्रोनची सुविधा उपलब्ध करून देऊन जिल्हा परिषद महिला सक्षमीकरणा साठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे महिला शेतकरी ‘ हम भी कुछ कम नही ‘ म्हणत ड्रोनसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करीत आहे. त्यामुळे महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे.
….
ड्रोनमुळे औषध फवारणी सुलभ
…
जिल्हा परिषदेकडून
महिलांना ड्रोन देण्यात येत असल्याने शेतीतील औषध फवारणीसाठी सोय होत आहे. शिवाय महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे. ड्रोनद्वारे औषध फवारणी त्वरीत व सुलभ असल्याने ग्रामीण भागात औषध फवारणीसाठी शेतकर्यांकडून ड्रोनची मागणी वाढत आहे. शिवाय ड्रोनद्वारे औषध फवारणी केलेली पिके अधिक उत्पादन दिल्याचे सांगण्यात येते.