तभा फ्लॅश न्यूज/वाशी : धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरण राज्यभर गाजत आहे. येथील काही आरोपींना पकडण्यात आला आहे. तर काही आरोपी मोकाट आहेत. विरोधकांकडून यापूर्वी टीकेची झोड उठवण्यात आली होती. तसेच भाजपचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी देखील जिल्ह्यातील गाजत असलेले एमडी ड्रग्स प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवून ड्रग्स माफियांच्या मुसक्या अवळणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील एमडी ड्रग्स, अमली पदार्थ विक्री, तस्करी, अवैध धंदे थांबले नाहीत तर तरुणाई व्यसनाच्या आहारी जाऊन हजारो घरी उध्वस्त होतील याला कुठेतरी आळा बसला पाहिजे याची मागणी जिल्हाभर जोर धरू लागली. परंडा विधानसभेचे माजी आमदार राहुल मोटे यांनी काही महिन्यांपूर्वी अमली पदार्थ ड्रग्स माफियांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन केली होती. परंतु जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहे.
पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई केल्या जात नसल्याने स्वतः मंत्र्यांना अवैध धंदे सुरू असलेल्या ठिकाणावरती छापे टाकून कारवाई करावी लागत असल्याचे समोर येत आहे. याचे उदाहरण म्हणजे राज्याचे मत्स्य मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये खुलेआम सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर ‘सिंघम स्टाईलने’ स्वतः छापा टाकत अवैध धंद्याचा पर्दाफाश केला.
वारंवार पोलिसांकडे तक्रारी करून सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई केली जात नसल्याने राणे यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन कारवाईचा बडगा उगारला.