तभा फ्लॅश न्यूज/बदनापूर : बदनापूर शहराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नगरपंचायतीच्या बेजबाबदार प्रशासनामुळे शहरात कचऱ्याचे ढिगारे, गटारमिश्रित पाण्याचा पुरवठा, आणि अनागोंदीचा माहोल निर्माण झाला आहे. स्वच्छता मोहिमेचा बडगा फडकवणाऱ्या नगरपंचायतीची प्रत्यक्षातील अवस्था मात्र संतापजनक आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचले असून, घंटागाड्यांच्या खरेदीचा केवळ गवगवा झाला. प्रत्यक्षात त्या गाड्या धूळ खात पडल्या असून, नागरिक दुर्गंधी आणि रोगराईच्या धोक्याशी सामना करत आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही स्वच्छतेकडे बोटचेपी धोरण!
शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य व्हॉल्व्ह थेट गटारात बुडालेला आहे. परिणामी, महिन्यातून एकदाच येणारे पाणीही गटारमिश्रित होऊन नागरिकांच्या नशिबी येते आहे. या प्रकारामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पाणीपुरवठ्याची पाईपलाइन ठिकठिकाणी गळती झाली असून, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे.
नगरपंचायत स्थापन होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला, पण अधिकारी आणि पदाधिकारी अजूनही खेडेगावाच्या मानसिकतेत अडकले आहेत. आमदार नारायण कुचे यांनी विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असतानाही शहरात विकासकामे होताना भेदभाव केल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होते आहे.
नगरपंचायतीचा कारभार म्हणजे केवळ घोषणांचा खेळ!
घंटागाड्या, स्वच्छता अभियान, पाणीयोजना यांवर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण प्रत्यक्षात त्याचा ठोस परिणाम नागरिकांच्या जीवनात कुठेच दिसून येत नाही. बाजारपेठेतील भाजी मंडईचेही नियोजन ढासळले असून, नगरपंचायतीला मूलभूत सोयीसुविधा देण्यात अपयश आले आहे.
नागरिकांमध्ये वाढता संताप; सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे बदनापूर शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अधिकारी शहरात राहतच नाहीत, घंटागाड्या गायब आहेत, आणि पाण्यात गटार मिसळते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालावे, अन्यथा जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल.
असा इशारा काँग्रेस जिल्हा सचिव जावेद कुरेशी यांनी दिला.