सोलापूर – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 6 चे ह राज्यकर्त्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अक्षरशः वाटोळे झाले असून गेल्या पंधरा वर्षांत सत्तेत असूनही विरोधकांनी या प्रभागासाठी काहीही ठोस काम केले नाही, असा घणाघाती आरोप अपक्ष उमेदवार तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केला.
प्रभाग 6 मधील दमाणीनगर परिसरात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी सपाटे यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवत, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगितले. रस्ते, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली गेल्याने या प्रभागाची अवस्था दयनीय झाली आहे, असेही ते म्हणाले.तसेच आपण व आपल्या पॅनलमधील सर्व अपक्ष उमेदवार निवडून आल्यास या प्रभागाचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास करण्याची ठाम ग्वाही सपाटे यांनी दिली.
आपल्या ‘टोपली’ या निवडणूक चिन्हाच्या माध्यमातून राजकारणातील घाण साफ करून विकासाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपले पॅनल सर्वसमावेशक असून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदारांनी अपक्ष उमेदवार रेखा गायकवाड यांच्या पांगुळगाडा , कीर्ती शिंदे यांच्या कपाटाला तर अंकुश राठोड यांच्या रोडरोलर चिन्हालादेखील मत देत आपल्या सर्व पॅनलला विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रचार सभेस वरील सर्व अपक्ष उमेदवार यांच्यासह ॲड. बाबासाहेब सपाटे, प्रियांका सपाटे, लहू गायकवाड, बॉबी शिंदे, अतिश म्हेत्रे, दत्ता भोसले, सोनल भोसले, दत्ता खलाटी, नागेश रुपनर, नागनाथ पवार, श्याम गांगर्डे आदी मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























