कळंब / धाराशिव : येथील शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या मुलींच्या रग्बी संघाने अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने बलाढ्य ठाणे संघाचा पराभव करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला असून, महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ रोजी कोकमठाण (अहमदनगर) येथील आत्मा मलिक क्रीडा संकुल येथे शालेय राज्यस्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत मोहेकर महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या संघाला बाद करून कांस्यपदकावर नाव कोरले.
राष्ट्रीय स्तरावर ‘या’ दोन खेळाडूंची निवड:
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाच्या खालील दोन विद्यार्थिनींची महाराष्ट्र राज्याच्या संघात राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे:
१. कु. प्रांजली भराटे (१२ वी कला)
२. कु. श्वेता मगर (११ वी विज्ञान)
मोहेकर महाविद्यालयाचा यशस्वी रग्बी संघ:
या स्पर्धेत प्रांजली भराटे, वैष्णवी माळी, श्वेता मगर, श्रावणी कुरूंद, साक्षी भराटे, अपेक्षा जावळे, संस्कृती गव्हार, दीप्ती शिंदे, दिव्या निंबाळकर, ऋतुजा दोंदे, रूपाली कुपकर आणि रूपाली कुरूंद या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या यशस्वी खेळाडूंना श्रीमती सरस्वती वाघमारे, क्रीडा शिक्षक निलेश मुंडे, राजाभाऊ शिंदे, गंधार अनिल शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान , उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव , प्रा. जयवंत भोसले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.
























