सोलापूर – मोहोळ तालुक्यातील वडदेगाव, अनगर आणि बेगमपूर येथील शेतकऱ्यांनी हिवाळी व उन्हाळी हंगामासाठी ‘बॉबी’ या नामांकित व्हरायटीचे बियाणे खरेदी करून लागवड केली; मात्र संबंधित बियाणे डुप्लिकेट निघाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. याबाबत पांडुरंग एकनाथ दळवी (रा. वडदेगाव, ता. मोहोळ) यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, नर्सरीमध्ये टोकन करून संबंधित बियाण्यांची लागवड करण्यात आली होती. पीक वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्व काही सुरळीत असले तरी काढणीच्या वेळी अपेक्षित दर्जा न दिसल्याने उत्पादनाचा दर्जा खालावल्याचे स्पष्ट झाले. परिणामी व्यापाऱ्यांनी या मालाला नकार दिला असून लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेले उत्पादन शेतातच पडून आहे.
या वाणाला वाशी मार्केट तसेच दिल्ली मार्केट येथे मोठी मागणी असते. मात्र स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठेत मागणी नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित नॉन युसिड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संपर्क साधला असता, वाढत्या तापमानामुळे किंवा हवामान बदलामुळे फळांचा रंग बदलल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मात्र तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात अशी समस्या नसून कंपनीने वितरित केलेल्या सुमारे १२०० किलो बियाण्यांच्या विशिष्ट लॉटमध्येच हा दोष आढळून आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे येत आहे.


























