शिमला, 11 जुलै (हिं.स.) : हिमाचल प्रदेशच्या चंबा येथे आज, शुक्रवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी होती. तर भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 5 किलोमीटर असल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) सांगितले.
चंबा येथे शुक्रवारी सकाळी 6 वाजून 23 मिनीटांनी भूकंपाचा पहिला हादरा बसला. त्यानंतर लागोपाठ 3 सौम्य धक्के जाणवले. परंतु, भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कुठल्याही जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाही. भूकंपाचे धक्के बसताच स्थानिकांनी घराबाहेर धाव घेतली. तथापि, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने, अनेक भागात लोकांना हे धक्के जाणवले नाहीत. चंबा जिल्ह्यातील बहुतेक भाग भूकंपाच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असलेल्या झोन 5 मध्ये येतो. त्यामुळे येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात.