हिंगोली : लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभेतील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवारांची भव्य व उत्साही आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती, मतदारांशी संपर्क, प्रचार आराखडा, संघटनात्मक बळकटीकरण, तसेच विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास कसा संपादन करता येईल, यावर सखोल चर्चा झाली.
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत सांगितले की, “ही निवडणूक केवळ सत्ता मिळविण्याची नव्हे, तर जनतेच्या विकासासाठी आणि आपल्या कार्यसंस्कृतीचा ठसा उमटविण्याची संधी आहे.”
यावेळी वसमत विधानसभा क्षेत्रातील शेकडो इच्छुक उमेदवार, नगरसेवक, पदाधिकारी, तसेच विविध विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान वातावरणात उत्साह, जोश आणि आत्मविश्वास दिसून येत होता.
खासदार पाटील आष्टीकर यांनी यावेळी मतदारसंघातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरावे, असे आवाहन केले.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने बूथस्तरावर संघटन मजबूत करून पक्षाचा विजय निश्चित करावा, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या भव्य बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांनी पक्षाच्या विजयासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची शपथ घेतली. हॉल खचाखच भरलेला होता, जयघोष आणि टाळ्यांच्या गजरात बैठक अत्यंत उत्साहात संपन्न झाली.



















