सोलापूर – कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील चार दिवसांत ६०० ट्रकहून अधिक कांदा विक्रीसाठी आला आहे. गुरुवारी सुमारे १५ हजार ३३१ क्विंटल लाल तर १ हजार २०२ क्विंटल पांढरा कांदा विक्रीसाठी आला होता. गतवर्षीच्या तुलनेत आवक खूप कमी असताना देखील भाव वाढलेले नाहीत.सध्या कांद्याला सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल नऊशे ते अकराशे रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळत आहे.
दरम्यान, मागील तीन वर्षांत ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १५ हजार गाड्या कांदा विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळाले. पण, यंदाच्या अतिवृष्टी व पुरामुळे सोलापूर बाजार समितीतील कांद्याची आवक घटली आहे. सरासरी भाव देखील मागील सहा महिन्यांपासून दीड हजारांवर गेलेला नाही. सोलापूर, बीड, धाराशिव, पुणे, नाशिक या जिल्ह्यातील कांद्याचे हजारो हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कांदा अजूनही अपेक्षेप्रमाणे बाजार समितीत आलेला नाही.
सांगली, कर्नाटक, बीड येथून कांदा येऊ लागल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला किमान १०० रुपये आणि जास्तीत जास्त २२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सरासरी भाव ९५० ते १०५० रुपयांपर्यंत आहे. दुसरीकडे पांढऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये ते ३२०० रुपयांपर्यंत भाव आहे. दोन दिवसांपूर्वी पांढऱ्या कांद्याला सरासरी १७०० रुपये भाव होता, तो आता दोनशे रुपयांनी कमी झाला आहे. तर लाल कांद्याचा सरासरी भाव देखील १०० रुपयांनी उतरला आहे.
बाजार समितीत पांढरा कांद्याची आवक कमी असल्याने मागणी वाढवून दर तेजीत असल्याचे दिसत आहेत. गुरुवारी देखील पांढऱ्या कांद्याला लाल कांद्यापेक्षा जास्त दर मिळाला. २०० ते ३००० सरासरी १४५० प्रतिक्विंटल असा दर पांढऱ्या कांद्याला राहिला. तर लाल कांद्याची गुरुवारी सुमारे १५,३३१ क्विंटल इतकी आवक बाजारपेठेत दाखल झाली होती. त्याला १०० ते २००० सरासरी ९५० प्रति क्विंटल असा दर मिळाला.
चौकट
शेतकरी संकटाच्या चक्रव्यूहात
सोयाबीन, उडदास अपेक्षित हमीभाव नाही. कांद्यालाही समाधानकारक भाव मिळत नाही. दुसरीकडे उसाची एफआरपी एकरकमी मिळत नाही. अतिवृष्टी व पुरात पिकांचे मोठे नुकसान झाले, तरी सरकारकडून भरपाई देखील मिळालेली नाही. डोक्यावर बॅंकांचे कर्ज आहे, ते फेडायचे कसे हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे.
चौकट
तीन दिवसांतील कांदा अन् सरासरी भाव
दिवस आवक (ट्रक) सरासरी भाव
सोमवार २२३ १२००
मंगळवार १५३ ११००
बुधवार १९७ १०५०
 
	    	 
                                




















 
                