सोलापूर : २०६० पर्यंतच्या भविष्यातील गरजांचा विचार करून शहरातील सर्व नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जल वितरण व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू आहेत.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास सोलापूर हे स्वच्छ, सुरक्षित, सक्षम आणि आदर्श शहर बनेल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केला.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने इंद्रभुवन परिसरात आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर तंबाखूमुक्ती, कुष्ठरोग जनजागृती आणि बालविवाह प्रतिबंधक शपथ उपस्थितांनी घेतली. मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे यांनी या कार्यक्रमाचे संचलन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखाधिकारी डॉ.रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, नगरसेवक अमोल शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे , अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, नियंत्रण अधिकारी तपन डंके, सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी, युवराज गाडेकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, महादेव इंगळे, यांच्यासह विविध विभाग अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स रिफॉर्म्स कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल संगणक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यानंतर आयुक्तांनी संविधानातील मूल्यांचे पालन, लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नगर अभियंता विभागामार्फत रस्ता सुधारणा कामे पूर्ण झाली असून, ९८ कोटींचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प सुरू आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ४२९ कोटींची भूमिगत भुयारी गटार योजना कामे प्रगतीपथावर आहेत.भुयारी गटार योजनेअंतर्गत ४९ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी हे या यंत्रणेचे खरे कणा आहेत.त्यांच्या कल्याणासाठी पदोन्नती, वेतनवाढ, अनुकंपा नियुक्त्या आणि प्रलंबित देयकांबाबत नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता डिसेंबर २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. याशिवाय वारसा हक्क आणि अनुकंपा याच्या माध्यमातून मागील वर्षभरात १५० हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. घन कचरा व्यवस्थापन विभागात ५५ कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती आणि ३३० कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.
सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले. कार्यक्रमास कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, जनसंपर्क अधिकारी श्री. गणेश बिराजदार यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्तांचे ठळक मुद्दे
— २०६० पर्यंत दररोज पाणीपुरवठ्यासाठी ८९२ कोटींची जागतिक बँक सहाय्यित जलपुरवठा योजना
— उजनी–सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्पामुळे प्रायोगिक पाणीपुरवठा सुरू
— ९८ कोटींचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प प्रगतीपथावर
— ४२९ कोटींची भुयारी गटार योजना व ४९ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र
— सर्व महापालिका सेवा ऑनलाईन; नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार
— यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नती, वेतनवाढ, ४ टक्के महागाई भत्ता लागू

























