महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महायुतीतील सहभागाबाबत गुरुवारी मुंबईत नवीन अध्याय सुरू झाल्याचे दिसले. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास दीड तास चालेल्या या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसह इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे कळते. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात न आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
वांद्रे येथील या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक घेतली. यामध्ये मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. मेळाव्यासाठी शाखांनुसार बैठका घेण्याची सूचना राज यांनी केली असून, या मेळाव्याच्या निमित्ताने मनसे आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जाते. या मेळाव्याच्या आयोजनाबाबत राज यांनी इतर अनेक सूचना केल्याची माहितीही देण्यात आली.
मध्यरात्रीही खलबते?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी मध्यरात्री अज्ञात स्थळी भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दादर येथे ही बैठक झाल्याची चर्चा असून यावेळीही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.
तीन जागांची मागणी?
महायुतीतील सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चेत, मनसेने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तीन जागांच्या मागणीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नसला, तरी ही चर्चा राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली आहे. दक्षिण मुंबईसह नाशिक आणि शिर्डी मतदारसंघांचा यात समावेश असल्याचे कळते.
प्रवीण दरेकर यांच्याकडून स्वागत
‘राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास महाराष्ट्राच्या जनतेला हा निर्णय निश्चितच आवडेल. बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम राज ठाकरे करत आहेत,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर, मनसेचा महायुतीमध्ये समावेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर गुरुवारी वांद्रे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक झाली. या पार्श्वभूमीवर, प्रवीण दरेकर यांनी मनसेच्या महायुतीमधील समावेशाबद्दल प्रतिक्रिया दिली. ‘राज ठाकरे सोबत आले, तर आनंदच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे संकेत दिले होते. राज ठाकरे अमित शहा यांनाही भेटून आले. आता मुख्यमंत्र्यांसोबतही बैठक झाली,’ असे दरेकर यांनी सांगितले.
मनसे महायुतीमध्ये आल्यास दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळणार का, या प्रश्नावर दरेकर म्हणाले की, ‘बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. त्यांनी आता व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. जागावाटपाबाबत अनेक चर्चा आहेत. शिर्डीची जागा बाळा नांदगावकर यांना दिली जाईल का, याबाबतही चर्चा आहे. वास्तविक भाजपामध्ये जे पक्ष आले, त्यांना सामील करून घेतले, त्यांचा सन्मान केला आहे. त्यामुळे मनसेला आता कुठली जागा द्यायची, हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. त्यांचा सन्मान निश्चित होईल.’