शिंदेंनाच कल्पना नव्हती, भाजपसह बड्या उद्योगपतीच्या दबावाने देवरांचा शिवसेनाप्रवेश, संजय राऊतांचा दावा. ‘आमचा पक्ष, आमचा पक्ष’, असे म्हणणाऱ्या लोकांचं काय होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीचा दबाव आणि एका उद्योगपतीच्या सांगण्यावरुन मिलिंद देवरा यांना स्वत:च्या पक्षात प्रवेश द्यावा लागला, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आले होते की, मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश करुन घ्या. इतकंच नाही तर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यापूर्वी शिंदे गटात गेलेले काही लोक ‘आमचा पक्ष, आमचा पक्ष’, असे म्हणत असतात. अशा लोकांचं आता काय होणार? उद्योगपतींच्या दबावामुळे जर बाहेरुन आलेले लोक तुमच्या पक्षात ताबडतोब मोक्याच्या पदांवर जाणार असतील तर या गटाचं भविष्य काही खरं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. राऊत यांच्या आरोपावर आता शिंदे गट आणि भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेस हायकमांडने या गोष्टीची गंभीर दखल घेतल्याची चर्चा आहे. मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांकडून यासंदर्भात अहवाल मागवण्यात आल्याचेही सांगितले जाते.
राम मंदिर वादग्रस्त जागेपासून ४ किलोमीटर अंतरावर: संजय राऊतअयोध्येतील राम मंदिरासंदर्भात भाजप पक्ष कायम, ‘मंदिर वही बनाऐंगे’ असा नारा देत आला आहे. मात्र, आता अयोध्येत जाऊन बघा. ज्या जागेवर राम मंदिर बांधलं जाणार होतं, तिथे प्रत्यक्षात मंदिराची उभारणी झालेली नाही. वादग्रस्त जागेपासून ४ किलोमीटर अंतरावर राम मंदिराची उभारणी सुरु आहे. त्यामुळे वादग्रस्त जागा अजूनही तशीच आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. राममंदिर आंदोलनात ज्यांचं काहीही योगदान नाही, असे लोक काहीही आरोप करुन स्वत:च हसं करुन घेत आहेत. कोट्यवधी हिंदूंचा अपमान करत आहेत. आतातरी उबाठा सेनेने हिंदू समाजाचा अपमान करणे बंद करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.