खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्याने यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबर यांची ‘पाणीदार आमदार’ म्हणून ओळख होती.
बाबर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नियोजित कार्यक्रम रद्द करत तातडीने सांगलीला रवाना झाले. त्या पार्श्वभूमीवर आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली.
खानापूर तालुक्यातील गार्डी या छोट्याशा गावात ७ जानेवारी १९५० रोजी बाबर यांचा जन्म झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी गार्डी गावच्या सरपंच पदापासून आपला राजकीय संघर्षमय प्रवास सुरू केला. सरपंच ते विधानसभा सदस्य असा त्यांचा मोठा राजकीय संघर्षमय प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. खानापूर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्यापासून विधानसभा सभागृहात त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवला. प्रसंगी मंत्रीपदापासून दूर राहत केवळ शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी लढणारे सर्वसामान्यांचे नेते म्हणून बाबर यांच्याकडे पाहिले जात होते.
राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा अनिल बाबर यांनी २०१९ मध्ये पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे १९९०, १९९९, २०१४, २०१९ अशा चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
शिवसेनेत फूट पडल्यापासून बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरुवातीपासून खंबीर साथ दिली होती. गुवाहाटीमध्येही ते शिंदे यांच्या सोबत होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो.