वैराग – स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीचे औचित्य साधून, एकता महिला मंच व आयुष व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जामगाव (आ) येथे राज्यस्तरीय ‘आदर्श महिला शिक्षक’ पुरस्कार वितरण सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेली महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली असून, कार्यक्रमाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.
विविध उपक्रम आणि स्पर्धांची मेजवानी
शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता आयुष व्यसनमुक्ती केंद्र, जामगाव (आ), ता. बार्शी येथे हा सोहळा पार पडणार आहे. केवळ पुरस्कार वितरणच नव्हे, तर महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यावेळी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने:
* विक्री प्रदर्शन मेळावा: महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री.
* कला व क्रीडा स्पर्धा: रांगोळी स्पर्धा, वाचन स्पर्धा आणि मनोरंजक ‘फणी गेम’ स्पर्धा.
* मार्गदर्शन मेळावा: उपस्थित महिलांना मान्यवरांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन लाभणार आहे.
५० आदर्श शिक्षिकांचा होणार सन्मान
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ५० महिला शिक्षिकांना यावर्षीचा ‘राज्यस्तरीय आदर्श महिला शिक्षक पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. समाजाच्या जडणघडणीत शिक्षिकांचे योगदान अधोरेखित करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
नियोजन बैठक संपन्न
या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. संदीप तांबारे व प्रभाकर क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते:
* डॉ. संदीप तांबारे (व्यसनमुक्ती तज्ज्ञ)
* प्रभाकर क्षीरसागर (प्रमुख, एकता महिला मंच)
* रेश्मा मुकटे (तालुका कोषाध्यक्षा)
* सानिया सय्यद,सुचिता कुटे, कल्पना वाघमोडे, सुनीता नवले, पद्मा आवटे, रुक्मिणी पायगन, सानिया सय्यद यांसह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या.
उपस्थित राहण्याचे आवाहन
सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून ‘एकता महिला मंच’च्या सदस्यांनी आणि महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा सोहळा एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास डॉ. संदीप तांबारे व प्रभाकर क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.























