धाराशिव – नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजपाला मदत केल्याचा आणि बोगस ‘एक्झिट पोल’ प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप निवडणूक निर्णय अधिकारी (RO) ओंकार देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. युवासेना (उबाठा) तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना तातडीने चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे १ डिसेंबर रोजी “Dharashiv 2.0” या पेजवरून बनावट टीव्ही चॅनेलचा वापर करून बोगस एक्झिट पोल व्हायरल करण्यात आला होता. यात भाजप उमेदवार नेहा काकडे विजयी ठरणार असल्याचे दाखवून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत सूर्यवंशी यांनी त्याच दिवशी जिल्हाधिकारी आणि RO यांच्याकडे तक्रार केली होती; मात्र ओंकार देशमुख यांनी कारवाई न केल्याने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप करण्यात आला.
स्थानिक पातळीवर प्रतिसाद न मिळाल्याने सूर्यवंशी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. आयोगाच्या आचारसंहिता कक्षाने तक्रारीची तात्काळ दखल घेत ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून सविस्तर अहवाल तातडीने पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक पारदर्शक पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यावरच पक्षपाताचा आरोप झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


















