सोलापूर – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये काँग्रेस पक्षाकडून दोन नगरसेवक निवडून आले असून, या दोन्ही नगरसेवकांनी एकत्र येत सोलापूर महानगरपालिकेत स्वतंत्र काँग्रेस गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने पुणे येथे काँग्रेस गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली.
निवडून आलेल्या नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली असून, या बैठकीत सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र गट स्थापन करण्यास एकमताने मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार, प्रभाग क्रमांक १५-ड मधून निवडून आलेले नगरसेवक चेतन पंडित नरोटे यांची काँग्रेस गटनेतेपदी निवड करण्यात आली.
त्यानुसार, काँग्रेस गटाची अधिकृत नोंदणी आज पुणे येथे विभागीय आयुक्त, चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे व नरसिंह आसादे हे उपस्थित होते. नोंदणी प्रक्रियेवेळी सर्व कायदेशीर व प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यात आल्या.
सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट स्थापन झाल्याने आगामी काळात महापालिकेच्या सभागृहात शहराच्या विविध नागरी प्रश्नांवर काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक ठामपणे, प्रभावीपणे आणि संघटितपणे मांडली जाणार आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काँग्रेस गट सक्रिय भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस गटाच्या स्थापनेमुळे सोलापूर महापालिकेतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून, येत्या काळात महापालिकेच्या कामकाजात काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक ठळकपणे दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

























