भोकरदन / जालना : आज दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहळाई येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया अतिशय आनंदाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पालक सभेमधून सर्व पालकांच्या उपस्थितीत व एकमताने ही निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व पालकांनी आपली शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचा निर्धार एकमताने केला. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच भौतिक सुविधा वाढवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.
पालकांमधून श्री. मधुकर पालकर यांची अध्यक्ष म्हणून, तर श्री. दादाराव पालकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून ज्ञानेश्वर बेंडे, गौतम वाघ, नीलम योगेश शिंदे, मीरा भगवान परनकर, संदीप भिका पालकर, अमित शहा, सीमा प्रमोद सपकाळ, तानाजी मुळे, पूनम मगर व भगवान मुळे यांची सर्वानुमते निवड झाली.
शाळेला विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय व अशासकीय यंत्रणांचा पाठपुरावा करणे, तसेच लोकसहभागातून शाळा विकास साधणे आणि प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी प्रयत्न करणे, असा ठाम संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
सदर निवड प्रक्रिया मुख्याध्यापक श्री. अनिल देविदासराव घोरपडे, शिक्षक गजानन बोरसे, आत्माराम पोटे व गजानन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शासन निर्णयाचे परिपूर्ण वाचन करून त्यानुसार कायदेशीर पद्धतीने शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले व शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करण्यात आला.

























