कळंब / धारशिव : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रीया पारदर्शक, सुरळीत आणि कायदेशीर तरतूदीनुसार पार पाडणेसाठी प्रशासनाकडून आवश्यक सर्व तयारी पुर्ण करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सुचनानुसार कामकाजाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कळंब शहराची एकुण मतदार संख्या 20958 असून पुरुष मतदार 10713 व महिला मतदार 10245 आहे.
कळंब नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 कळंब शहरामध्ये 24 मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. शहरामध्ये एकही संवेदनशिल मतदार केंद्र नाही. सर्व मतदान केंद्राची पाहणी व आवश्यक दुरुस्ती/सुविधांची पुर्तता पुर्ण करुन घेण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष मतदान कार्यक्रमासाठी कन्ट्रोल युनिट (CU) 24, बॅलेट युनिट (BU) 44 आणीबाणी प्रसंगी अतिरिक्त स्वरुपात 10 मतदान यंत्रे तयार ठेवण्यात आलेली आहेत. सदर मतदान केंद्रावर 96 मतदान केंद्रावरील अधिकारी व मतदाराची ओळख पटविणेसाठी 12 महिला कर्मचारी व 24 शिपाई असा एकुण 132 प्रत्यक्ष मतदान केंद्रावर अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच निवडणूकीवेळी प्रत्यक्ष आकडेवारी मा. राज्य निवडणूक आयोगास कळविणेसाठी व मतदानानंतर साहित्य जमा करुन घेणेकामी 40 अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करुन निवडणूकीचे काम सुरळीतपणे पार पाडण्यात येत आहे.
कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी पोलिस प्रशासना समवेत समन्वय साधून 1 उपविभागीय पोलिस अधिकारी, 01 पोलिस निरीक्षक, 02 सहायक पोलिस निरीक्षक, 6 पोलिस उपनिरीक्षक, 68 पोलिस अंमलदार व 65 हेामगार्ड यांची नेमणूक करुन कायदा व सुरक्षेचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे.
निवडणूक कामकाजसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेवून आवश्यक माहिती आणि जबाबदारी याबाबत सर्व प्रक्रीया पुर्ण असून मागदर्शक सुचना आचारसंहिता व निवडणूक नियमांची काटेकोर पालन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रीया सुव्यवस्थित व शांततेत पार पाडणेकामी सर्व नागरीक, मतदार व संबंधितांना प्रशासनाकडून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरी कळंब शहरातील सर्व सुजान मतदार यांनी आपला अमूल्य असा मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत ढोकले नगर परिषद कळंब प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


























