सोलापूर : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमअंतर्गत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्यातर्फे काथ्या उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध आहे, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काथ्या मंडळाचे रिजनल ऑफिसर श्रीनिवास बिटलिंग यांनी केले.
काथ्या मंडळातर्फे प्रभाग क्र. नऊ मधील दाजी पेठ व्यंकटेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत काथ्या कारागीरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध उत्पादने, त्यांचे उपयोग आणि त्यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारी यंत्रे यांच्याविषयी माहितीदेखील सादर करण्यात आली. काथ्या उद्योगाविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी काथ्या मंडळाच्या वतीने विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रदर्शन फेरी, उद्योजकता विकास कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आणि केंद्रीय एमएसएमई आणि काथ्या मंडळ यांच्या दिशानिर्देशांना अनुसरून काथ्या उद्योगाचा विकास करण्यासाठी याकार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
लघु व सूक्ष्म उद्योग रोजगार संधींची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोठे योगदान देत आहेत. काथ्यापासून तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या उपयोगाबाबत काथ्या उद्योग नवनवे मार्ग शोधून काढत असून संबंधित योजना आणि सेवा लोकप्रिय करून आता या उद्योगाचा विस्तार संपूर्ण देशात होत आहे आणि त्यातून अधिक रोजगार संधींची निर्मिती होत आहे, अशी माहिती या कार्यशाळेत
देण्यात आली.मंडळाचे रिजनल ऑफिसर श्रीनिवास बिटलिंग, सुरेश उमाप तसेच विकास शंकू यांचे या कार्यशाळेत मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, मेघनाथ येमूल, आनंद बिर्रू, नागेश सरगम, श्रीनिवास जोगी, दत्तात्रय पोसा, लक्ष्मीताई बदलापुरे, शेखर इगे, रामेश्वरी ताई बिर्रू, पवन गुंडेटी, अंबादास कनकी, श्रीकांत कुसुरकर, श्रीकांत घनाते, अनिल व्हनमाने, हरी सोमा, श्रीनिवास साई, मेघा इट्टम तसेच महिला उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन नागेश सरगम यांनी केले. मेघनाथ येमुल यांनी आभार मानले.
ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात योगदान
काथ्या उद्योगाच्या समग्र शाश्वत विकासासाठी भारत सरकारने काथ्या उद्योग कायदा 1953 अन्वये काथ्या मंडळाची स्थापना केली. या कायद्याअंतर्गत नेमून दिलेल्या मंडळाच्या कार्यामध्ये शास्त्रीय, तंत्रज्ञानविषयक आणि आर्थिक संशोधनासाठी अधिग्रहण, मदत आणि प्रोत्साहन देणे, आधुनिकीकरण, दर्जात्मक सुधारणा, मनुष्यबळ विकास, विपणन प्रोत्साहन आणि या उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्वांचे कल्याण यांचा समावेश आहे. केरळमधील कोची येथे मंडळाचे मुख्य कार्यालय असून कार्यालयाच्या अखत्यारीत देशभरातील 29 दुकानांसह एकूण 48 आस्थापना सध्या कार्यरत आहेत. हा उद्योग आज देशातील ग्रामीण भागात आर्थिक विकास घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे.


















