प्रकरणात मोठी कारवाई; जाहिरात कंपनीच्या माजी संचालिकेसह अभियंत्याला अटक
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची चौकशी करणाऱ्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ‘इगो मीडिया’ जाहिरात कंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठे आणि सिव्हिल कंत्राटदार सागर कुंभार यांना शनिवारी गोव्यातून अटक केली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांचे पथक जान्हवीच्या मागावर होते. या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर येथे १३ मे रोजी अवाढव्य होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू झाला, तर ५०हून अधिक जण जखमी झालेत. गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेने ‘इगो मीडिया’चा संचालक भावेश भिंडे याला उदयपूर येथून अटक केली. भिंडे न्यायालयीन कोठडीत असतानाच मुलुंड येथील अभियंता मनोज संघू याला अटक करण्यात आली. संघू महापालिकेचा मान्यताप्राप्त अभियंता असून, त्यानेच ‘इगो मीडिया’ला १२० फूट वाय १४० फूट आकाराच्या होर्डिंगसाठी स्थिरता प्रमाणपत्र दिले होते.