बार्शी – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपळे दुमाला यांच्यावतीने जि.प. प्राथमिक शाळा, उपळे दुमाला येथे समाधान शिबीर घेण्यात आले. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपळे व परिसरातील गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये ईसीजी, बीपी, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी तसेच इतर सर्वसाधारण आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. नागरिकांना औषधांचे मोफत वाटप करण्यात आले व आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले. तसेच नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे बार्शी तहसीलदार यांनी स्वतः उपस्थित राहून बीपी व शुगर तपासणी करुन घेतली व उपक्रमात सहभाग नोंदविला. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता वाढल्याचे दिसून आले. बार्शी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिता बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. उपळे (दु.) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता कुलांगे (ढगे) तसेच नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर उकीरडे यांच्या उपस्थितीत शिबीर पार पडले. या उपक्रमात आरोग्यसेवक वैभव धर्मे यांनी नागरिकांना तपासणीसाठी मार्गदर्शन व समुपदेशन केले.
यावेळी आरोग्य सहाय्यक शंकर काळे व आरोग्य सहाय्यिका सौ. ज्योती मैंदर्गी यांनी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण करुन शिबीर पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती मीना जाधव तसेच समुदाय आरोग्य अधिकारी संग्राम गायकवाड, रवी दळवे, श्रीमती रोहिणी शार्दुल, श्रीमती अंजुम शेख यांनी प्रत्यक्ष नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यावेळी आशा गटप्रवर्तिका सौ. सुनिता माने व नसीमा डोंगरे यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून नागरिकांना वाटप केले. तसेच आशासेविका श्रीमती सुप्रिया गायकवाड, सौ. वनमाला सुरवसे, सौ. वैशाली शेंडगे, सौ. प्रतीक्षा जाधव, सौ. विमल माळी, सौ. सुजाता कसबे, वाहनचालक नामदेव जाधव या सर्वांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी परिचर पृथ्वीराज कांबळे यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे उपळे दुमाला व शेजारील गावांतील नागरिकांना मोठा फायदा झाला असून, आरोग्याबाबत जनजागृती करण्यास या शिबिराचा मोलाचा वाटा ठरला आहे.
























