कुरुल – आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना कुरुल येथील शिवकृपा मिल्क प्रॉडक्ट्सचे मालक प्रमोद गुरव यांनी आपली कृतीतून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
घटना अशी की, प्रमोद गुरव हे बँक ऑफ इंडिया, कुरुल शाखेतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता एटीएम मशीनमध्ये आधीच्या ग्राहकाने काढलेले दहा हजार रुपये तिथेच राहिलेले त्यांच्या निदर्शनास आले. अनेकजण अशा वेळी दुर्लक्ष किंवा गैरवापर करण्याचा मोह टाळू शकत नाहीत; मात्र प्रमोद गुरव यांनी क्षणाचाही विलंब न करता ते पैसे थेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक संतोष दळवी यांच्याकडे सुपूर्द केले.
प्रमोद गुरव यांच्या या प्रामाणिक कृतीचे शाखा व्यवस्थापक संतोष दळवी, किशोर सूर्यवंशी, विलास हिंगोले, प्रताप कोकरे,श्रीकांत इंगोले, बाजिदवली शेख, उमेश गायकवाड, तुकाराम कांबळे यांनी मनापासून कौतुक करत त्यांचा सन्मान केला. बँकेच्या सिस्टीममध्ये बातचीत वल्ली शेख यांनी तपासणी केल्यानंतर सदर दहा हजार रुपये बाबुराव पाटकर यांचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बँकेने बाबुराव पाटकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांची रक्कम सुरक्षितपणे परत केली.
आपले हरवलेले पैसे परत मिळाल्याने बाबुराव पाटकर यांनीही प्रमोद गुरव व बँक प्रशासनाचे आभार मानले. या घटनेमुळे कुरुल परिसरात प्रमोद गुरव यांच्या प्रामाणिकपणाची जोरदार चर्चा असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
व्यवसायात यशस्वी असतानाही सामाजिक मूल्ये जपणारे प्रमोद गुरव यांचे वर्तन तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, “प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे” याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. |


















