सांगोला – लाडकी नदी महामंडळ स्थापन करा अशी मागणी ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे सांगोला तालुक्यातील माणगंगा सेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातल्या सर्वच नद्या अखेरच्या घटका मोजताहेत. हजारो वर्षे वैभव संपन्नतेत वाहणाऱ्या नद्या वृक्षतोड, अतिक्रमणे, वाळू तस्करी या कारणांनी पन्नास वर्षात नद्यांचे अस्तित्व धोक्यात आणले. या मृत्यूपंथाकडे चाललेल्या नद्या वाचायच्या असतील, पुर व दुष्काळमुक्त करायच्या असतील, पर्यावरण समतोल राखायचा असेल व पुढच्या पिढ्या सुलभतेने जगाव्याशा वाटत असेल तर आम्ही शासनाला विशेषता मा.मुख्यमंत्री यांना विनंती करू इच्छितो की, राज्य पातळीवर स्वतंत्र अधिकाराचे लाडकी नदी महामंडळ स्थापन करावे. या महामंडळावर डॉ.तुकाराम मुंडे साहेबांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करावी आणि सध्या महाराष्ट्रातील १०८ नद्यावर काम करणारे नदी समन्वयक व त्यांचे सहकारी त्यांच्याकडे नदीपात्राची सुरुक्षाव्यवस्था सोपवावी. प्रति किलो मीटर दोन लाख रु. नदीवर खर्च केले तर दोन वर्षांत नद्या पुरमुक्त व प्रदुषणमुक्त होवून पुनरुज्जीवित होतील.
२ आक्टोबर २०२२ रोजी वर्धा येथून चला जाणूया नदीला अभियान जाहीर करण्यात आले होते. परंतु पुढे तीन वर्षांत काहीच काम झाले नाही. उलट या तीन वर्षात हजारो कोटी ब्रास वाळू गेली आणि नद्या अधिक संकटात आल्या. अनेक नदी समन्वयक स्वयंस्फूर्तीने नदीवर काम करताहेत. त्यांना थोडी जरी प्रेरणा दिली असती तर पुरामुळे द्यावी लागलेली नुकसान भरपाई काही प्रमाणात वाचू शकली असती.
आम्ही १५ वर्षांपासून माणगंगा नदीवर नदी स्वच्छतेचे काम करत आहोत, ७५ कि.मी. नदीपात्र स्वच्छ केल्यामुळे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या नदीपात्रातून पन्नास हजार क्युसेक्सने पाणी वहात होते. तरीपण नदीपात्राबाहेर पाणी आले नाही. इतर नद्यांच्या बाबतही असेच अपेक्षित आहे. म्हणून ताबडतोब लाडकी नदी महामंडळ स्थापन करुन त्वरित काम सुरु केले तर पुढे येणारे पूरसंकट कांहीं प्रमाणात नियंत्रणात येईल असे सदर निवेदनात नमूद केले आहे.