काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मुलाखतीचा अर्धवट व्हिडीओ अपलोड केला होता. याप्रकरणी गडकरींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि महासचिव जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. परंतु, या नोटीस नंतरही काँग्रेसने तो व्हिडीओ सोशल मिडीयात कायम ठेवला असून आज, शनिवार सकाळपासून व्हॉटसएप्पवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
नितीन गडकरींचे वकील बलेंदू शेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून नितीन गडकरी यांच्या मुलाखतीमधील अर्धवट वाक्ये शेअर करून गडकरी केंद्र सरकारच्या विरोधात बोलत असल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. काँग्रेसने हेतुपुरस्सरपणे मुलाखतीचा अर्धा व्हिडिओ शेअर केला, त्यामुळे गडकरींच्या वक्तव्याचा अर्थ वेगळा झाला. वकिलाच्या म्हणण्यानुसार, नोटीसमध्ये गडकरींबद्दल लोकांच्या नजरेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेसचे हे कृत्य म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विकृत व्हिडिओला काही अर्थ नाही. नोटीस मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत व्हिडिओ हटवण्यासोबतच काँग्रेस नेत्यांना 3 दिवसांत गडकरींची लेखी माफी मागावी लागेल. नोटीस नाकारण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतु, त्यानंरही काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर व्हिडीओ कायम आहे. उलट व्हॉटस्एप्पवर देखील व्हायरल करायला सुरुवात केलीय.