सोलापूर : शहरातील नाल्यांची व्यवस्था कार्यक्षम राहावी. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक विभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील नाले व ड्रेनेज कामांची नियमित पाहणी करून कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत करण्याची काळजी घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील गणेश पेठ शॉपिंग सेंटर परिसर नाला, कुंभार वेस येथील रूपा भवानी चौकाजवळील नाला, लेप्रसी कॉलनी कचरा डेपो या ठिकाणी पाहणी केली. त्याप्रसंगी त्यांनी आदेश दिले. यावेळी सहायक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकूलवार, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, विभागीय अधिकारी बक्षी, सहायक अभियंता शकील शेख आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी या तिन्ही ठिकाणी सुरू असलेल्या नाल्यांच्या कामाची आणि कचरा डेपो परिसरातील स्वच्छतेची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी नाल्यांमध्ये बॉक्स कन्व्हर्ट बसविण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, त्याआधी तांत्रिक तपासणी करून नाल्यांची लेव्हल तपासावी आणि त्यानुसार काम सुरू करण्याचे निर्देश दिले.
लेप्रसी कॉलनी कचरा डेपो परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम व्यवस्थितपणे पूर्ण झाले आहे का, याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे, तसेच नाल्यांची अडथळामुक्त वाहतूक सुनिश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.






















